कार्ला (वार्ताहर) – निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्ला गडावर एकत्र जमले. ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत कार्ला येथील आई एकवीरादेवीचे दर्शन करुन देवीच्या चरणी मशाल पेटवून मशालीची विधीवत पुजा करत नव्या पर्वाला सुरूवात करत, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
नवनियुक्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड व शिवसेना मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.11) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी शिवसेनेच्या समर्थनार्थ मनोगत व्यक्त केली. सुरूवातीला शिवसेनेचे निवडणुक चिन्ह मशाल होती. या चिन्हावर निवडणूक लढविली असून, त्यामध्ये घवघवीत यश मिळविल्याच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. आतापर्यंत शिवसेनेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सूज्ञ मतदारांनी वाऱ्यावर सोडून दिल्याचा इतिहास असल्याचे मत उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
अंधेरी येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मशाल चिन्ह काही तासांतच राज्य व देशभरातील लाखो नागरिकांपर्यंत पोचले आहे. यावरून शिवसेनेचे जनमानसातील लोकप्रियता लक्षात येते. कोणी कितीही प्रयत्न करून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केल्यास, ती पुन्हा दुप्पट वेगाने उसळून येते, असे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी सांगितले.




