पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाला पूरक असणारी ई बाइक तयार केली आहे. ही बाइक टाकाऊ वस्तुंपासून तयार करण्यात आली आहे. याबद्दल अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी “ई बाइक’बद्दल माहिती सांगितली. मागच्या चाकास हब मोटार बसवून त्या मोटारीला पॉवर देण्यासाठी 48 व्होल्टच्या लिथियम बॅटरीचा वापर केला आहे. बॅटरीचे कनेक्शन हब मोटारीला दिले आहे. वाहन चालत असतानाच ही बॅटरी चार्जिंग व्हावी म्हणून त्यावर सौर उर्जानिर्मितीचे पॅनलही जोडण्यात आले आहे.
यावेळी विद्यालयास वॉटर कूलर व प्युरीफायर प्रसव ऑटो कॉम प्रा.लि.चे मनिष जैन यांनी भेट दिलेल्या स्टेनलेस स्टीलच्या 80 लिटरच्या वॉटर कुलरचे उद्घाटनही अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नव्याने तयार झालेल्या रायफल शूटिंग प्रकल्पासही भेट दिली. शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राजेंद्र डिंबळे यांनी दिलेल्या 14 वर्षाखालील मुलींच्या संपूर्ण संघातील खेळाडूंना मोफत किटचे वाटपही जांभळे हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीत रस्त्यावर होत असलेले अपघात टाळण्यासाठी उपायोजनाही सुचविली आहे. त्या उपाययोजनेमध्ये दोन बाइकमध्ये आपण जर सेंसर बसवले आणि त्या सेंसरमध्ये गाडी जवळ आली की, आपल्याला सेंसरद्वारे सूचना मिळेल व होत असलेले अपघात टाळता येतील. जीवित हानी होणार नाही. याबाबत सेन्सर वर संशोधन चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.




