पिंपरी (प्रतिनिधी) देशात विषमता सांगणारी मनुवादी व्यवस्था बदलण्याची सुरुवात झाली आहे. आर्थिक विषमतेविरोधात बंड होत आहे. हे बंड करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. देशात शोषण करणारे जो पर्यंत असतील, तो पर्यंत त्यांच्या विरोधात लढा देणारे निर्माण होतच राहतील. विचारात बदल केल्याशिवाय शोषणाचा अंत होणार नाही. बुद्धाचा मार्गच या देशातील शोषणाचा अंत करण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एचए मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंजली आंबेडकर, अमित भुईगळ, दिशा शेख, प्रियदर्शी तेलंग, अशोक सोनोने, देवेंद्र तायडे आदींसह विविध क्षेत्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनुवादी व्यवस्था ही अत्याचारी, शोषण, गुलाम करणारी, आर्थिक व्यवस्थेपासून वंचित ठेवणारी आहे. त्याला देशातील युवकांकडून विरोध करण्यात येत आहे. या मनुवादी व्यवस्थेला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आणि संतांनी विरोध केला आहे. महापुरुषांच्या विचारांची नवीन मानवतावादी व्यवस्था रुजवायची आहे. सामाजिक, समता, बंधुता, बरोबरीची व्यवस्था उभा करण्याचे चारित्र्य उभे करून ते वाढविणे गरजेचे आहे. इथल्या विषमतावादी व्यवस्थेमुळे ब्रिटिशांनी देशावर राज्य केले. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. सध्या देशात आदिवासी बांधवांना अद्यापही न्याय मिळत नाही. त्यांच्यापर्यंत मूलभूत हक्क पोचत नाहीत. मात्र त्यांच्या नावावर देशात राजकारण केले जात आहे. सामाजिक, राजकीय दृष्टिकोनातून हा समाज एक वेगळी ओळख निर्माण करत असताना अनेकांना त्याबाबत पोटशूळ झाला आहे. सध्या देशात भ्रष्टाचारी व्यवस्था आहे. ही बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले स्वतःचे चारित्र्य बौद्ध धम्माच्या माध्यमातून निर्माण करूयात. हुकूमशाही प्रवृत्ती देशातून नष्ट करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, मेळावा होणे ही माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे. पिंपरीतून तिला वाढविण्याची चालना मिळत आहे. गावकुसाबाहेर असलेले पिढीत शोषित वंचित आज बौद्धांच्या मार्गावर चालत आहेत. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेणे हे राजकीय परिवर्तन आहे. त्याच्या मार्गावरून जाताना पिंपरी चिंचवड शहरात देखील राजकीय परिवर्तन होईल.



