पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील क आणि इ प्रभागातील स्थापत्य कार्यकारी अभियंत्यांचे कार्यभार बदलण्यात आले आहेत. सुरक्षा विभागाचे विभागप्रमुख म्हणून मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर (नि) उदय जरांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, क क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले संजय घुबे यांच्याकडे आता इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाचा देखील कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची आस्थापना क क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागात राहील. इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्याकडे आता स्थापत्य उद्यान आणि स्थापत्य क्रीडा विभागांची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना स्थापत्य विभागात असणार आहे.



