पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू होऊन १८ ऑक्टोंबर रोजी दोन महिने पूर्ण झाले आहेत. या दोन महिन्यांच्या कार्यकाळात आयुक्त सिंह यांनी महापालिकेच्या प्रत्येक ” विभागाचा आढावा घेत माहिती घेतली. सध्यस्थितीत विभागामार्फत काय योजना, प्रकल्प राबविण्यात येत आहेत, संबंधित विभागात काय नवीन करता येईल, याबाबत योग्य त्या सूचनाही दिल्या. दोन महिने होत आले तरी फक्त आढावा बैठका, स्मार्ट सिटीच्या बैठकांत आयुक्त सिंह पुरते गुरफटले गेल्याची चर्चा पालिका वतुळात रंगली आहे. त्यामुळे विविध विभागांच्या फायली आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी पडून आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात आयुक्त म्हणून सिंह यांचा म्हणावा तसा ठसा अद्याप दिसून आलेला नाही.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची पिंपरी महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली. १८ ऑगस्ट रोजी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. सिंह यांनी यापूर्वी ग्रामीण भागात सेवा केली आहे. शहरी भागात आणि महापालिका आयुक्त म्हणून त्यांची पहिलीच नियुक्ती आहे. त्यामुळे सिंह यानी पहिल्याच दिवशी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सिंह यांनी त्यानंतर सर्व विभागाचा सविस्तर आढावा घेत पिंपरी-चिंचवड माहिती जाणून घेण्यासाठी आजअखेर प्रयत्न करत आहेत. त्यांचा कार्यकाळाला दोन महिने अद्याप प्रशासनावर ठसा उमठविता आला नाही. सिंह अद्याप आढावा बैठका, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकांमध्ये गुरफटल्याचे दिसून येत आहे.
विविध विभागांच्या फायलीवर वेळेत स्वाक्षरी होत नसल्याने अधिकाऱ्यांची ओरड सुरू आहे. त्यामुळे आयुक्त साहेब आता पुरे झाल्या बैठका आणि अभ्यास, शहरहिताचे, लोकहिताचे काही चांगले निर्णय घ्या. आंद्रा धरणातून लवकरात लवकर शहराला १०० एमएलडी पाणी आणा, स्वच्छ भारतमध्ये १९ क्रमांकावर फेकले गेलेल्या शहराला स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करा, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून उमटू लागली आहे.
- आयुक्तांचा प्रशासनावर नाही अंकुश
प्रत्येक आयुक्तांची काम करण्याची एक वेगळी पध्दत असते. नवख्या आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाच्या नाड्या काही दिवसात आवळल्या होत्या. काही आयुक्तांची प्रशासनावर पकड असते तर काही केवळ दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. शेखर सिंह यांचेही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. कार्यालयीन वेळेत बाहेर फिरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नेमलेले भरारी पथक फक नावापुरते राहिले आहे. तसेच पाटील यांनी ठरवून दिलेला ड्रेसकोडचाही अधिकाऱ्यांना विसर पडला आहे.



