पुणे : मुसळधार पाऊस सुरू झाला… तासभर पाऊस होऊनही जोर काय कमी होण्याचे नाव घेत नव्हता… बघता बघता आंबिल ओढ्याच्या पातळीत वाढ होती… काळजाचा ठोकाच चुकला अन पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पण सुदैवाने ओढ्याचे पाणी पात्रबाहेर न आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही अवस्था झाली होती कात्रज पासून ते नवी पेठेपर्यंत आंबिल ओढ्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची काळजाचा ठोकाच चुकला.
रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरवात झाली. पाऊस प्रचंड मोठा असल्याने रस्त्यांना अवघ्या काही वेळात नद्यांचे स्वरूप आले. पावसाचा जोर कमी होत नसताना आंबिल ओढ्याच्या परिसरातील रहिवाशांच्या मनात भितीचे ढग जमा होऊ लागले. ओढ्याला लागून असलेल्या घरांमधील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी घुसते की काय अशी भीती वाटायला सुरवात झाली. जसा जसा वेळ जात होता, तसे नागरिकांमधील चलबिचल वाढली. इतका मोठा पाऊस होता की बाहेर पडणेही शक्य होत नव्हते.
अंबिल ओढ्याची पाणी पातळी वाढली असली तरी कात्रज परिसरात तुलनेने पाऊस कमी आहे आणि तलावातील पाणी कमी झाल्याने तो भरून वाहण्याची शक्यता कमी असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी या भागातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते नागरिकांना धीर देण्यासाठी बाहेर पडले.‘‘आजच्या पावसामुळे २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवण झाली. आमचे घर ओढ्यालाच लागून असल्याने घरात पुन्हा पाणी घुसते की काय अशी भीती वाटली. नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण झाल्याने धोका टळला.’’
गणेश पवार, टांगेवाला कॉलनी




