चेन्नई, दि. २२ – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो या संस्थेच्या सर्वात वजनदार रॉकेटद्वारे ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रहांचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले जाणार आहे. त्या रॉकेटच्या प्रक्षेपणाचे काऊंट डाऊन शनिवारी पहाटेपासून सुरू झाले आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून हे रॉकेट झेपावणार आहे. ८,००० किलोग्रॅमपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची या एलव्हीएम ३ – एम २ रॉकेटची क्षमता आहे. म्हणून या रॉकेटला आजपर्यंतचे सर्वात वजनदार रॉकेट म्हटले जाते.
रविवारी होणाऱ्या या प्रक्षेपणाला महत्त्व आहे कारण इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लि. चे पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि युनायटेड किंगडम-आधारित नेटवर्क ॲक्सेस असोसिएट्स लिमिटेड ( वनवेब लिमिटेड) यांच्यातील व्यावसायिक व्यवस्थेअंतर्गत हे अभियान हाती घेण्यात आले आहे, असे इस्रोने म्हटले आहे. या मिशन वनवेबद्वारे एकूण ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाईल. त्यासाठी ५,७९६ किलो वजनाचे पेलोड असलेले पहिले भारतीय रॉकेट बनवले गेले आहे.




