नवी दिल्ली, दि. २२ केंद्र – सरकारने काही पिकांसाठी अलीकडेच नव्याने आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत. पण केंद्राने या किमतीच्या बाबत शेतकऱ्यांची फसवणूकच केली असून त्यांनी केलेली वाढ ही महागाई दरापेक्षाही खूपच कमी आहे असा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे.
काँग्रेसतर्फे या विषयावर प्रतिक्रिया देताना पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना वाढीव किमान आधारभूत किंमत दिल्याबद्दल भाजपचे लोक स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार आला आहे.
सरकारने आधारभूत किमतीच्या बाबतीत शेतकऱ्यांशी दगाबाजीच केली आहे. सरकार काही वेळा एमएसपी जाहीर करते पण त्या दराने शेतकऱ्यांकडन माल घेण्यात कायमच टाळाटाळ करते आहे. एमएसपीच्या दराने शेतकऱ्यांचा माल घेणे याची कायदेशीर हमी सरकारने दिली पाहिजे आणि त्याची कायदेशीर तरतूदही सरकारने तातडीने केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की मोदी यांनी सन २०१४ पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी येणारा खर्च आणि त्यावर किमान ५० टक्के जादा दराने आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते हवेत विरले आहे.


