कामशेत (वार्ताहर) मागील काही दिवसापूर्वी बरसलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर आता मावळवासियांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुपारी उन चांगलेच तापत आहे.
ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी राज्यातील बदलत्या वातावरणामुळे कधी थंडी तर कधी उकाडा असे अनुभव येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. सकाळच्या सुमाराला काही भागांमध्ये धुकेही दाटत आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याची उपासना करणाऱ्या नागरिकांमध्येही उत्साह वाढला आहे.




