पुणे – राज्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता ही प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून गुरुवारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया ऐन दिवाळीत सुरू होत असल्याने या वेळापत्रकाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे गुरुवारचे परिपत्रक रद्द करून नव्या वेळापत्रकाचे नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. आता ३१ ऑक्टोबर ते ५ जानेवारी या कालावधीत बदली प्रक्रियेचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत.
दिवाळीचा सण आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करायच्या कामांचे स्वरुप लक्षात घेता त्यासाठी अधिकचा वेळ लागणार असल्याचे नमूद करून २० ऑक्टोबरचे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, जिल्हांतर्गत बदलीची कार्यवाही वेळापत्रकानुसारच पूर्ण होणे आवश्यक आहे. यात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांना दिले आहेत.




