पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने टाकाऊ साहित्यांतून तयार केलेले आकर्षक शिल्प शहरातील विविध चौकांत लावण्यात आले आहेत. काही महिने उलटले तरी शिल्प लोकार्पण करण्यात आले नाहीत. हिरव्या कपड्याने झाकलेल्या अवस्थेत त्या शिल्पाचे लवकरच अनावरण केले जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले होते. मात्र, राजकीय नेत्याच्या वेळेअभावी अजूनही हे शिल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.
टाकाऊ साहित्यांतून नवनिर्मिती करीत पालिकेने शहरातील विविध १५ चौकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिल्प उभारले आहेत. त्या भोवती आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. त्या शिल्पाचे अनावरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ११ जूनला होणार होते. मात्र, तो दौरा अचानक रद्द झाला. त्यानंतर काही दिवसांत राज्यात सत्तांतर झाले. तसेच, पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचीही अचानक बदली झाली.
त्यामुळे १५ पैकी बहुतांश शिल्पांचे अद्याप अनावरण झालेले नाही. ते शिल्प कपड्याने झाकून ठेवण्यात आले आहेत. पावसामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर या शिल्पांचे अनावरण करावे, अशी मागणी होत आहे.




