पिंपरी : सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रील बनवून त्याआधारे समोरच्या टोळीला आव्हान देणे, दहशत निर्माण करणे असे सर्रास प्रकार समोर येत आहेत. आमनेसामने दमबाजी करत, हत्यारे नाचवत दहशत निर्माण करण्यापेक्षा ऑनलाइन रिलद्वारे दहशत पसरविण्याचा पॅटर्न सध्या जोर पकडत आहे. पोलिसांचे यावर लक्ष असले तरी ही पिलावळ हळूच डोके वर काढण्याचा प्रयत्न करते. शस्त्र बाळगणे, खरेदी करणे आणि विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे प्रकार समोर येताच पोलीस अशांना बेड्या ठोकतात.
महाळुंगे परिसरात नुकतीच एक खुनाची घटना घडली. नऊ मुलांनी मिळून कोयत्याने वार करत हा खून केला. त्यातील सातजण अल्पवयीन आहेत. त्यांचा म्होरक्या अवघ्या १७ वर्षांचा असून त्याचे सोशल मीडियावर भरमसाठ रील आहेत. त्यामध्ये तो कधी शस्त्र बाळगताना तर कधी दारू, सिगारेट पिताना दिसत आहे. मित्राच्या खुनात आरोपी असलेल्या तरुणाच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या मुलांनी त्याला आडरानात नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार करत ठार मारले. खून केल्यानंतर कुठलेही भय न बाळगता म्होरक्याने मित्रांना फोन करून खून केल्याचे सहजपणे सांगितले, त्याचे संभाषण समोर आल्यानंतर संवेदनशील मनांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
थेरगाव क्वीनने मध्यंतरी चांगलेच वातावरण ढवळले होते. अश्लील शेरेबाजी करत धमक्या देणाऱ्या क्वीनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तिच्यावर कारवाई केली. त्यानंतर देखील तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातील एकात थेरगाव क्वीनला पोलीस घेऊन जात असतानाचा व्हिडीओ देखील आहे. चिखली मधील यमभाईने पैलवानी आवेशात मांडी थोपटून आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात, असे म्हणत व्हिडीओ बनवला. त्यानंतर गुंडा विरोधी पथकाने यमभाईला बेड्या ठोकल्या. पोलिसांची अशा पोस्टवर नजर असल्याने दहशत निर्माण करणारे रील सर्वत्र व्हायरल होण्यापूर्वीच त्याला आळा बसत आहे.
सध्या ऑनलाइन शॉपिंग साईटवर सहजपणे शस्त्र उपलब्ध होत आहेत. नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक बदलून अनेकजण ही शस्त्रे मागवतात. आर्टिस्टिक शस्त्रे लग्न समारंभात वापरण्यासाठी घेतली जातात. त्याला परवानगी असते. मात्र त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय पिस्टल, काडतुसे, तलवार, कोयता, कुन्हाड अशी शस्त्रे सर्रास मिळतात. दिघी येथे एकाने ऑनलाइन माध्यमातून तलवारींचा भलामोठा साठा मागवला होता.
तो प्रकार दिघी पोलिसांनी उघडकीस आणला. शस्त्र बाळगणे, खरेदी, विक्री, त्याचा वापर करणाऱ्यांवर शस्त्र अधिनियमनाव्ये गुन्हे दाखल होतात. शस्त्रे बाळगून सिनेस्टाइलने धमकीवजा व्हिडीओ बनवले जातात. यातून प्रतिस्पर्धी टोळ्यांना आव्हान दिले जाते. यामुळे दोन टोळ्यांमध्ये वाद होण्याचीही शक्यता निर्माण होत आहे.




