पिंपरी (प्रतिनिधी) – गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मोठा गाजावाजा करीत राज्य सरकारने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देणार असल्याचे जाहीर केले. मात्र दिवाळी संपून आठवडा होत आला आहे तरी देखील काही दुकानांमधून नागरिकांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. आनंदाचा शिधा मिळावा म्हणून नागरिक शिधावाटप दुकानात वारंवार चकरा मारत आहेत. त्यामुळे शासनाने घोषित केलेला आनंदाचा शिधा नागरिकांसाठी मनस्तापाचा शिधा ठरला आहे. रहाटणी येथील स्वस्त धान्य दुकानासमोर दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी नऊ वाजता मोठमोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या.
हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला आनंदाचा मोठा सण मानला जातो. गोरगरीब नागरिकांचा दिवाळी सण आनंदात जावा यासाठी युती शासनाने अवघ्या १०० रुपयांमध्ये साखर, तेल, रवा आणि चनाडाळ देण्याची घोषणा केली. हे साहित्य नागरिकांना वेळेत देता यावे, यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिधावाटप दुकानदारांकडून आगाऊ पैसे घेण्यात आले.
मात्र पाच जिल्ह्यांना एकच पुरवठादार असल्याने त्याच्याकडून वेळेवर आनंदाचा दुकानदारांना पडला शिधा पुरवठा झाला नाही. काही दुकानांमध्ये केवळ दोन किंवा तीन वस्तू आल्या आहेत. आलेल्या वस्तू शिधा धारकांना देताना त्यांची दुकानदारांशी भांडणे होत आहेत. तुम्ही आमचा आनंदाचा शिधा असा आरोप दुकानदारांवर होत आहे.
सुरवातीला आनंदाचा शिधा ऑनलाइन देण्याचे आदेश शासनाने दिले. मात्र पॉस मशीन संथगतीने चालत असल्याने आनंदाचा शिधा ऑफलाइन देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. परंतु अजूनही शिधावाटप दुकानदारांना ऑफलाइन शिधावाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.
पॉस मशीनवर आनंदाच्या शिध्याचे वाटप दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना कसा आनंदाचा शिधा द्यायचा, असा प्रश्न शिधावाटप आहे. काही दुकानदारांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व वस्तूस्थिती सांगितली. मात्र आमचे नाव आल्यावर अधिकारी आमच्यावर डुग धरतील, त्यामुळे आमच्या नावाने काही छापू नका, असे सांगितले.
सर्व स्वत धान्य दुकानात शुद्ध पोहचला असून ८० टक्के वाटप झालेले आहे काही नागरिक गावाला गेले असल्याने त्यांनी शिधा नेलेला नाही. ऑफलाइन शिधावाटपाबाबत व्हॉट्स अॅप ग्रुपवर आदेश देण्यात आले आहेत. आनंदाच्या शिध्याची कशी नोंद ठेवायची, याबाबतही सांगितले आहे.
– दिनेश तावरे, परिमंडल अधिकारी
दुकानदारांच्या समस्या अनेक असून याबाबत आम्ही आवाज उठवत असतो. मात्र त्यामुळे अधिकारी नाराज होतात, अगदी वरपासून फोन येतात खरी वस्तूस्थिती अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. परंतु ते प्रसारमाध्यमांना सांगू शकणार नाही. शिधावाटप दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी (दि. २) मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत आम्ही आमच्या समस्या मांडू
– विजय गुप्ता,
खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेयर प्राइस शॉपकीपर फेडरेशन




