पिंपरी : आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणांमधून पिंपरी चिंचवड शहराला २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळणार आहे. हे पाणी शहरवासीयांना लवकरात लवकर देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, आता आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी भामा आसखेडच्या पाण्यासाठी प्रशासनाला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
जलवाहिनी टाकणे, जॅकवेल उभारणे यासह नवलाख उंब्रेचे बीपीटी (ब्रेक प्रेशर टैंक), असे महत्त्वपूर्ण टप्पे ओलांडावे लागणार आहेत. आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहराला पाणीपुरवठा होणार आहे. चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सद्य:स्थितीत आंद्रा धरणातील १०० एमएलडी पाणी तात्पुरत्या स्वरूपात इंद्रायणी नदीमधून उचलण्यात येणार आहे. निघोजे येथे अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.
- अशुद्ध जलउपसा केंद्राचा अद्याप पायाही नाही खोदला
भामा आसखेड धरणातील १६७ एमएलडी पाणी उचलण्यासाठी १.२० हेक्टर जागेत २०० एमएलडी प्रतिदिन क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र (जॅकवेल) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला चाकीतर्फे वाडा येथील जागेचा ताबा मिळाला आहे. मात्र, अद्याप या कामाचा पायाही प्रशासनाने खोदला नाही.
- नवलाख उंब्रेतील ‘ब्रेक प्रेशर टँक’ पूर्ण करण्याचे आव्हान
महापालिका तात्पुरत्या स्वरूपात आंटा धरणाचे पाणी इंद्रायणी नदीतून घेणार आहे. मात्र, आंदा व भामा आसखेड या दोन्ही धरणांतील १६७ एमएलडी पाणी बंद जलवाहिनीद्वारे नवलाख उंबे येथे आणले जाणार आहे. तेथे एमआयडीसीच्या १ हेक्टर जागेमध्ये ब्रेक प्रेशर टैंक (बीपीटी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा काढलेली नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण करून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.




