पिंपरी : महिला वर्गात स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे. पूर्वी गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळत असे. मात्र, आता ती जागा स्तनाच्या कर्करोगाने घेतलेली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिकेच्या वतीने थेरगावात लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची दिली.
गेल्या काही वर्षांत महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याला प्रामुख्याने कारणे म्हणजे बदलती जीवनशैली हे आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण पूर्वी अधिक होते. आता ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. ज्या महिलांची मासिकपाळी लवकर सुरू होते व उशीर वयात संपते. तसेच ज्या स्त्रियांनी बाळास अंगावरचे दूध पाजलेले नाही. तसेच ज्या स्त्रियांच्या मातेस अथवा आईकडील नातेवाइकास ब्रेस्ट कॅन्सर झाला होता अशा स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
काय आहेत लक्षणे….
स्तनामध्ये न दुखणारी गाठ तयार होणे. स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे. स्तनावर जखम होणे. स्तनाच्या त्वचेत बदल होणे, ही प्रामुख्याने लक्षणे आढळून येतात. हल्ली 30 नंतरच हे लक्षणे आढळून येत आहेत. त्याला बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तपासण्यांद्वारे खातरजमा करण्यात येते.
स्वतः तपाणी करणे, 30 वर्षांवरील स्त्रियांनी , वर्षात एकदा मॅमोग्राफी करावी. गाठ आढळल्यास बायोप्सी तपासण्यांद्वारे गाठीतील पेशी काढून त्याची खातरजमा करणे. तसेच सीटी स्कॅन / पेट स्कॅन या आधुनिक तपासण्या कॅन्सर शरीरात किती पसरला आहे, याची कल्पना देतात.




