मावळ : ४ नोव्हेंबर पासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित झाल्याचे आढळले नाहीत. दोन दिवसांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिराला दुसऱ्या दिवशी गैरहजर राहिले. त्यानंतर माध्यमांना दादांची उपस्थिती लाभली नाही. त्यामुळे दादा कुठे गायब झाले, पक्षात अजूनही दादा नाराज, गुव्हाटीचा मार्ग तपासा अशा अनेक बातम्या आल्या. यावर आज पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः खुलासा केला आहे.
ते आज मावळ तालुक्यात दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले पाच – सहा वर्षांपासून परदेशात जाण्याची संधी मिळाली नाही. संधी अनेकदा आली पण कामामुळे मला जाता आलं नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरला रात्री उशीरा मी फ्लाईटने परदेशी गेलो. आणि १० तारखेला रात्री उशीराने आलो. सहा महिन्यांपूर्वीच हा दौरा ठरलेला होता. पण इथे माझ्या मागे मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. दादा वाचून यांचं काय अडतं काय माहित? दादाला काही खासगी लाईफ आहे की नाही? पुढे वारेमाप प्रचार केला. कारण नसताना माझी बदनामी करायची, कारण नसताना गैरसमज निर्माण करायची. सहा महिन्यांपूर्वीच तिकिटे काढली होती. म्हणून परदेशात गेलो होतो, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
तसंच, अजित पवार कुठे गेले याची माहिती मिळवण्याकरता माझ्या कार्यालयाशी संपर्क साधायचा होता. माझी उगाच बदनामी केली गेली, असंही अजित पवार म्हणाले. एका वृत्त संकेतस्थळाला माहिती देताना अजित पवार म्हणाले की, मला मध्यंतरी खोकला होता. मी आजारी होतो. पण नंतर मी सहा महिन्यांपूर्वी ठरल्याप्रमाणे दौऱ्याला गेलो. पण इथे काहीही बातम्या दिल्या गेल्या.



