तळेगाव :- सहा महिन्यांपूर्वीच माझा कौटुंबिक परदेश दौरा ठरलेला असताना पक्षीय कार्यक्रमातील माझ्या अनुपस्थितीचे भांडवल करून काहींनी गैरसमज पसरवून माझी राजकीय बदनामी केली आहे, असे स्पष्टीकरण देत, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी “दादालाही खासगी लाईफ आहे की नाही?”,दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही, असा थेट सवाल केला. उगाच काहीही उठवून बदनामी करायची, असं म्हणत गायब असणाऱ्या पवारांनी ती नाराजी नसुन बदनामी असल्याचे सांगत यामागच गूढ अखेर स्वतःच समोर आणलं.
तळेगाव जनरल हॉस्पिटल अँड कॉन्हवलसन्ट होम संस्थेच्या ऑनको-लाईफ कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.११) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, मायमर मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, संस्था अध्यक्ष गणेश खांडगे व उपाध्यक्ष चंद्रभान खळदे, गणेश काकडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रमेश साळवे, बापू भेगडे, कॅन्सर सेंटर प्रमुख उदय सरदेशमुख, डॉ. प्रताप राजेमहाडीक, डॉ. सत्यजित वाढोकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणातील ताज्या घडामोडी, सेवाभावी संस्थांचे कार्य, रस्ते अपघात, व्यसनाधिनता, मेडीसिटी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि कुप्रवृत्ती आदि विषयावर अजितदादा पवार यांनी त्यांची परखड मते मांडली. पवार म्हणाले, की राजकीय मंडळींनी समाजाला कशाची गरज आहे, ते ओळखून त्या वाटेने जायला पाहिजे. भेदाभेद आणि जातीपातीचे विषय समाजाचे आरोग्य बिघडवणारे आहेत.
आरोग्य चांगले राखण्यासाठी आहार, व्यायाम, विचार आणि आचार संतांनी सांगितलेल्या मार्गाने प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात किडनी आणि शरीराचे अवयवांची तस्करी करून रूग्णांच्या जिवाशी खेळणा-यांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे. ऑनको-लाईफ कॅन्सर सेंटरच्या चालकांनी देखील माफक दरात गरजूंना उपचार देताना सामाजिक जाणीव ठेवून आपली संवेदनशीलता हरवून न देता रूग्णांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कर्करोगावर मात करत असताना दाखविलेल्या सन २००४ पासूनच्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या काही आठवणीही सांगितल्या.
आमदार सुनील शेळके म्हणाले, की या सेंटरचा उपयोग जिल्ह्यातील रूग्णांना व्हावा म्हणून महात्मा फुले जन आरोग्य आणि शासनाच्या इतर योजना लागू करण्यासाठी राज्यशासनाने मंजुरी द्यावी यासाठी अजितदादांनी लक्ष द्यावे. यावेळी डॉ. प्रतीक वाढोकर, शैलेश शाह, राजेश शहा आदींची भाषणे झाली. यावेळी काही सेवाभावी संस्थांच्या प्रमुखांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. उपाध्यक्ष चंद्रभान खळदे यांनी आभार मानले.




