आळंदी : राजकीय तडजोडीत अडकलेली आळंदी नगरपरीषदेची निवडणुक कधी पार पडणार? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीबाबतीत वारंवार बदल होत असल्याने ती नेमकी कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आगामी नगरपरीषद निवडणुकीत पुन्हा एकदा नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण पुरुष किंवा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यास, आळंदी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आळंदीतील परंपरेनुसार चालत आलेले कुऱ्हाडे आणि घुंडरे कुंटबातच लढत होऊ शकते. अशी शहरामध्ये चर्चा सध्या आळंदीच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. आळंदी शहरातील बहुतांश कुऱ्हाडे कुटुंबातील नेते हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे भाजपकडून घुंडरे कुटुंबाला नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.
मुदत संपलेल्या नगरपरीषदेच्या बाबतीत संभ-मावस्था असल्याने आळंदी शहरातील राजकीय वातावरण मात्र अजूनही थंडच आहे. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आल्याने कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी आशा मात्र राजकीय पक्षातील इच्छूकांना आहे. येत्या 20 तारखेला दोन वर्षाच्या खंडानंतर प्रथमच आळंदीची कार्तिकी वारीही आठ ते दहा लाखाच्या घरात भरणार असून वारी पार पडतात सर्वजण निवडणूक जाहीर होण्याच्या प्रक्रियेकडे डोळे दिपून आहेत, यंदा ज्येष्ठांपेक्षा तरुण युवकांमध्ये जास्त उत्साह दिसून येतो त्यामुळे त्यांनी गेल्या सहा महिन्यापासूनच विविध मार्गाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निर निराळे प्रयोग आळंदी शहरांमध्ये सुरू केले आहेत.
आळंदी नगरपरिषदेवर सत्ता स्थापनेसाठी शहरातील कार्यकर्ते व राजकीय पदाधिकार्यांकडून कानोसा घेतला जात आहे. आळंदी नगरपरीषदेवर भाजपची एकहाती सत्ता होती, शहरातीलतील दोन पक्षात जोरदार लढत होत असते. तर कधी पदाधिकारी बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्न करत असतात, मात्र तरुणांची वाढती संख्या लक्षात घेता ज्येष्ठ त्यांना कसे आवरणार हे निवडणुकीत समजणार आहे.
आळंदी नगरपरीषदेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून निधीची कमतरता जाणवत आहे. आळंदी नगरपरीषदेची निवडणूक ही विकासकांवर आधारित होणे गरजेचे आहे, मात्र तसे न होता गावकी, भावकी, गट- तट व नातेवाइकांची मर्जी सांभाळून होत असल्याने अनेकांना ही निवडणूक जड जाणार हे निश्चित. गेल्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता,त्यात भाजपने एकहाती विजय मिळवला होता. सध्याचे राजकीय वातावरण पहाता यंदा मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना होईल अशी शक्यता आहे. “सत्तेसाठी काय पण” म्हणणारे राजकीय नेते मात्र ऐनवेळी पॅनल आणि आघाडीसाठी प्रयत्न करतील हे काही सुज्ञ आळंदीकर सांगत आहे.




