पिंपरी (प्रतिनिधी) स्वस्त धान्य दुकानाबाहेर फलक लावले जात नसल्याची तक्रार जागृत नागरिक महासंघाने परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत दिनेश तावरे यांनी गंगानगर येथील दुकानदारास फलक लावण्याची सूचना दिली. तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन चुकीचे घडले असल्यास कडक कारवाई करू, असे आश्वासन तावरे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका धारकांना धान्यांपासून वंचित ठेवत आहेत. शिधापत्रिकेवर धान्य किती आले याची अनेकांना माहितीच मिळत नाही. त्या बाबत माहिती देणारा फलक लावणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. गंगानगर येथील स्वस्त धान्य दुकानदारास फलक लावण्याबाबत जागृत नागरिक महासंघाने तावरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महासंघाच्या कमिटीने अन्नधान्य वितरण परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांची भेटही घेतली होती.
संबंधित दुकानदाराला माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रकारचे फलक तात्काळ लावण्याचे आदेश देत असल्याचे, शिवाय तक्रारीनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिनेश तावरे यांनी महासंघाला दिले. या वेळी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अशोक कोकणे, सचिव उमेश सनस, सदस्य दत्तात्रय देवकर उपस्थित होते.



