पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात अन्न पदार्थांची विक्री करणारे शेकडो ‘फूड टेम्पो’ अपघाताला निमंत्रण देत आहेत. वाहनाच्या मूळ रचनेत सोयीनुसार बदल केले असल्याने ही वाहने धोकादायक आहेत. मात्र आरटीओ कार्यालय आणि महापालिका प्रशासनाकडून परिणामकारक कारवाई होत नसल्याने अशा फूड टेम्पोची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात ‘फूड टेम्पो’ वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये आइस्क्रीम, फळे, अन्नपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. असे वाहन असलेल्या व्यावसायिकाला एका जागी दुकान थाटण्याची आवश्यकता नसते. रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी असतात. काही बस स्थानके, रुग्णालये, रेल्वेस्थानक, आयटी पार्क, भाजी मंडई, एमआयडीसी आणि शहरातून जाणाऱ्या महामार्ग आदी ठिकाणी अशी वाहने अधिक प्रमाणात दिसतात.
मात्र, बहुतांश व्यावसायिकांनी अशा वाहनांसाठी आरटीओकडे ‘फूड टेम्पो’ म्हणून नोंदणी केली नाही. त्यामुळे शहरातील शेकडो ‘फूड टेम्पो’ बेकायदा व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहने सध्या फक्त अपघातालाच नव्हे तर वाहतूक कोंडीला आमंत्रण देणारी दिसतात.
66 वाहनामध्ये खाद्यपदार्थांची विक्री करता येईल, अशा पद्धतीने वाहनांची रचना करण्यासाठी आरटीओची परवानगी घ्यावी लागते. जर एखाद्या टेम्पो मालकाने आमच्याकडे रितसर अर्ज केल्यास त्याला तशी परवानगी दिली जाते. नियमबाह्य बदल केलेल्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी, पिंपरी चिंचवड




