तळेगाव स्टेशन, १७ नोव्हेंबर : गेल्या काही दिवसापासून तळेगाव दाभाडे मधील स्टेशन परिसरातील विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
तळेगाव स्टेशन परिसरामध्ये महावितरण या कंपनीची वीज असून विजेचा काही दिवसापासून सारखाच लपंडाव चालू आहे. यामुळे रहिवासी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेला आहे. महावितरणाने वीज काम दुरुस्तीसाठी गुरुवार हा दिवस निवडलेला असून गुरुवार वगळता इतर दिवशीही वीज मोठ्या प्रमाणामध्ये गायब होते.
दिवसभर व रात्री सुद्धा वीज खूप वेळ बंद होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती त्याचा मोठा परिणाम होतो. रहिवासी वर्ग त्यावरती पर्याय म्हणून चार्जिंग बल्ब व इन्व्हर्टरला पसंती देत आहेत. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटे फिरण्यासाठी मोठा वर्ग बाहेर पडतो. परंतु वीज नसल्याकारणाने हातामध्ये बॅटरी घेऊन नागरिकांना फिरण्यासाठी बाहेर पडावे लागते. महावितरण कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन वीज सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून मोठ्या प्रकर्षाने होत आहे.




