लोणावळा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातील स्वातंत्रवीर सावरकर चौकात निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नव्हे तर भारत तोडो यात्रा असल्याची टीका करीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर दुधाने अभिषेक करण्यात आला.
भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची. ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले. यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. पण त्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत सावरकरांच्या पत्राचे पुरावे सादर करत राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहे.
लोणावळा शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या युवमोर्चाच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनात बोलताना भाजपचे माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर यांनी राहुल गांधी यांना या भारत जोडो यात्रेचा कंटाळा आला असून ही यात्रा थांबावी म्हणून अशी वेडीवाकडी वक्तव्य केली जात असल्याचे सांगितले.
या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी हे लोकांमध्ये तिरस्कार आणि द्वेषाची भावना पसरवीत असल्याची टीका शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांनी केली. तर महाराष्ट्र भूमीत येऊन येथील देशभक्तांची अवहेलना आणि अपमान करु नका, आम्ही याचा निषेध करतो असे वक्तव्य युवामोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे यांनी यावेळी केले. या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक विजय सिनकर, अरुण लाड, अर्जुन पाठारे, अभय पारख, प्रदीप थत्ते, कमलेश सैगर, सुषमा कडू, चारुलता कमलवार, अदिती होगले, श्रवण चिकणे, प्रथमेश पाळेकर, शैलेश ठाकर, वैभव वायकर, चैतन्य दळवी, जयप्रकाश परदेशी यांच्यासह भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.




