पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी- चिंचवडमधील दळवणवळणाला चालणा देणारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील ९०, ६५ आणि ३० मीटर रिंगरोड विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘पीएमआरडीए’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या रिंगरोडमुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वाघोलीमार्गे आळंदी- मोशी- निगडी पुनावळेमार्गे तळवडे आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये अगदी काही मिनिटांतच पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यात यश येणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या विकासाला चालणा देण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीएच्या हद्दीत ६५ मीटर रुंदीचा वर्तुळाकार बाह्यवळण मार्गाचे (रिंगरोड) काम प्रस्तावित आहे. सोलू ते वाघोली (वडगाव शिंदे) हा पुणे महापालिकेच्या हद्दीपर्यंतचा प्रादेशिक योजनेतील (रिजनल प्लॅन) ६५० मीटर लांबीचा रिंगरोड पहिल्या टप्यात विकसीत करण्यात येणार आहे.
यामध्ये पीएमआरडीच्या हद्दीतील ६५० मीटर रस्त्याचा काही भाग ६५ मीटर रुंदीचा होणार आहे. तर प्रादेशिक योजना आराखड्यातील ९० मीटर रुंद रस्त्याचा समावेश आहे. हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पठारे मळा, चन्होली हद, स्पाईन रोड व तेथून पुढे निगडीतील जुन्या पुणे-मुंबई माहामार्गाला जोडणार आहे. यामुळे वाघोली ते लोहगाव, आळंदी, मोशी, निगडी, पुनावळे मार्गे हिंजवडी जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे. त्यामुळे हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमुळे लगतच्या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रिंगरोड विकसित करण्याची जबाबदारी त्या त्या महापालिकांची आहे. त्यानुसार मोशी पांजरपोळ चौक ते चन्होलीपर्यंत ९.५० कि.मी. लांबी व ३० मीटर रुंदीचा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून विकसित करण्यात येत आहे. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा पीएमआरडीएने केला आहे. तर, पुणे महापालिकेच्या हदीतील सोलू ते वडगाव शिंदे हा ५.७० कि.मी. रिंगरोडचा भाग महापालिकेमार्फत विकसित करण्यात येत आहे. याच धर्तीवर ६५० मीटर रस्त्याची लांबी ३० मीटर रुंदीने पीएमआरडीए विकसित करणार आहे. रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पुणे-अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फायदा होणार आहे.




