पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ नोव्हेंबर रोजी अवैध लॉटरी सेंटरवर निगडी, देहूरोड आणि वाकडमध्ये छापा मारला. या छापासत्रानंतर पोलीस दलात संलग्न आणि निलंबनाचे सत्र सुरु आहे. बुधवारी रात्री निगडी पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांनी सुरुवातीला निगडीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांना नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले. तसेच, देहूरोड येथील सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे आणि वाकडचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव यांच्यासह तब्ब्ल अठरा कर्मचाऱ्यांना बावधन येथील वाहतूक विभागाला संलग्न केले. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढलेल्या या आदेशामुळे एकाच खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी (दि. २३) रात्री निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकात असलेले कर्मचारी सतीश ढोले, विलास केकाण, नितीन सपकाळ राहुल मिसाळ, या चौघांना थेट निलंबित करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
अवैध लॉटरी सेंटरच्या कारणावरून निगडीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. मात्र, देहूरोड आणि वाकडच्या अधिकाऱ्यांवर तशी कारवाई झाली नाही.




