पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या सुशोभीकरणासाठी तात्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी टाकाऊ साहित्यांतून तयार केलेले विविध शिल्प पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकात उभारण्यात आले आहेत. मात्र, मागील सहा महिन्यापासून ते शिल्प कापडात झाकून ठेवल्याने चौक दिसू लागले आहेत. यामधील एक महानगरपालिकेच्या जवळील मोरवाडी चौकात घोड्याचे चित्र नागरिक निहाळुन पाहत होते. त्यांच्या मनात पालिका प्रशासन शहरवासीयांना घोडा कधी दाखवणार असाच प्रश्न उपस्थित होत असावा.
https://maharashtramaza.online/?p=161347
पालिकेच्या विविध विभागाच्या गोदामातील टाकाऊ साहित्यातून विविध 15 सुंदर कलाकृती तयार करण्यात आल्या. यामध्ये शहरभर मोरवाडी चौकात लाल घोडा, पिंपळे निलख येथे हत्ती, रावेत येथील मुकाई चौकात मावळा, पिंपळे निलख जंक्शन चौकात बिबटा, साई चौकात पान खाणारे सुरवंट, नाशिक फाटा चौकात बैल, कुदळवाडी रोटरी चौकात कार्ट टू कार, केएसबी चौकात डिजिटल बॉक्स, दिघी मॅगझिन चौकात पालखी यात्रा, निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्प चौकात मोर, दुर्गादेवी टेकडीवर खार, पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात जीवनचक्र, निसर्ग, मानवाचे नाते, गुढीपाडवा अशी शिल्पे उभारण्यात आली. यातील वादात सापडलेले डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पॅरडाइज काढून टाकण्यात आले. महापालिका प्रशासन या शिल्पाच्या बाजूस सुशोभीकरण साठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र राजकीय अनासतेमुळे ही शिल्पे अद्यापही झाकली आहेत.
पालखी यात्रा शिल्पाचे अनावरण पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात आले आहे. तर, खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधामुळे थेरगावातील फ्लॉवर ऑफ पॅरडाइज शिल्प हलविले. उर्वरित 13 शिल्पे अनावरण न झाल्याने कापड्यात झाकून ठेवण्यात आले आहेत. तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जूनला या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, काही कारणांमुळे तो दौरा रद्द झाला.
त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले काही महिने जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. मात्र, नव्याने पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील शहरात अनेक वेळा येऊन गेले, तरीही महापालिका प्रशासनाकडून या शिल्पाच्या उद्घाटन करण्याचा निर्णय का घेतला नाही. महापालिका निवडणूकीच्या करिता उद्घाटने रखडून ठेवली आहेत का? अगोदरच पावसामुळे कापड झाकलेल्या शिल्पांची दुरवस्था झालेली आहे. परिणामी, चौक विद्रुप दिसत आहेत. त्यामुळे शिल्पाचे तातडीने अनावरण करावे. शहरातील नागरिकांना किमान महापालिके समोरील घोडा तरी दाखवावा या मागणीस जोर धरत आहे.




