हिंजवडी : माण येथील एका बंद केलेल्या डंपिंग ग्राऊंडवर अज्ञातांनी आग लावली. मात्र या परिसरात अनेक बांधकाम व्यवसायिकांचे मजूर राहत असल्याने ते सर्रास सिगारेट, गांजा ओढण्यासाठी या परिसराचा आधार घेत असतात. सिगारेट ओढल्यानतर न विझवता फेकून दिल्यानेच आग लागली असावी अशी परिसरात चर्चा आहे. आयटीनगरीतील माण ग्रामपंचायतला याची माहिती मिळताच तत्काळ ग्रामपंचायत सदस्य व राजकीय नेत्यानी घटनास्थळी धाव घेत तात्काळ आग विझवण्याची कार्यवाही केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

माण, ता.मुळशी येथील द क्लिफ गार्डन सोसायटीच्यावर डोंगरात असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर ही घटना घडली. याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले की बांधकाम मजूर या परिसरात मोठ्या प्रमाणात येजा करत असतात. डोंगर जवळ असल्याने अज्ञात ठिकाणी व्यसन करण्यासाठी हे मजूर या परिसरात येत जात असतात. वेगवेगळ्या ४-५ ठिकाणी ही आग लावल्याची माहिती उपस्थितांकडून मिळाली आहे. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांसोबतच मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी ३ जेसीबी, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या २ गाडया व २ पाण्याचे टँकर बोलाविले. यामुळे आगेचे रौद्ररूप धारण होण्यापूर्वीच आगीला विझवण्यात यश आले आहे.
याबाबतीत संबंधित परिसरातील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन त्या समाज कंटकांचा बंदोबस्त करण्याचे सांगण्यात आले आहे. माण ग्रामपंचायतने हे डंपिंग ग्राऊंड फार पूर्वीच बंद केले असून गावामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. या परिसरात अनेक बांधकाम प्रकल्पासाठी एमआयडीसीने परवानगी दिली आहे. मात्र, त्या प्रकल्पातील कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनासाठी काहीही कारवाई केलेली नाही. त्याची सर्व जबाबदारी माण ग्रामपंचायत उचलत आहे. ज्या ठिकाणी आग लागली तो कचरा डंपिंग ग्राऊंडची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे लवकरच टेंडर काढणार असून निसर्गाची झालेली हानी देखील भरून काढली जाणार आहे अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.
या कार्यवाहीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, मुळशी तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, सरपंच अर्चना आढाव, ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे, प्रदीप पारखी, प्रशांत पारखी, विजय भोसले, शुभांगी भोसले, अरुणा लोखंडे, सचिन आढाव तसेच द क्लिफ सोसायटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.




