कामशेत : जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पाथरगाव हद्दीमध्ये इंद्रायणी नदीवर ब्रिटिश राजवटीत १८९६ साली बांधण्यात आलेल्या पुलाने १२५ वर्ष पुर्ण केली आहेत. ह्या सव्वाशे वर्ष जुन्या दगडी चिरेबंदी पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असूनही प्रशासनाच्या वतीने याच्या दर्शनी भागात केलेली तात्पुरत्या स्वरूपाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामूळे हा पूल बाह्य बाजूस सुस्थितीत असल्यासारखा भासतो.
मात्र, एमएसआरडीसी अंतर्गत असणाऱ्या या पुलाला बाहेरील बाजूने मागील अनेक वर्षांपासून पिंपळ, वड, उंबर आदी जातीच्या वृक्षांनी वेढले असुन खोलवर पसरणाऱ्या या झाडांच्या मुळ्यांनी अक्षरशः पूल पोखरला आल्याचे चित्र आहे. यामुळे दोन दगडांमध्ये झाडाची मुळे शिरल्याने पूल कमकुवत झाला आहे.
पुणे मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. या ठिकाणावरून जाणाऱ्या वाहनांना तीव्र वळणावरून जावे लागते. परंतु, या पुलावर कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाही. काही वर्षांपूर्वी याच पुलाला समांतर असा पूल बांधण्यात आला होता. या पुलाच्या पिचिंग वर देखील मोठ्या प्रमाणावर गवताची वाढ झाल्यामुळे याही पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुला खाली मोठया प्रमाणावर वाहून आलेला गाळ व कचरा साचला असून प्रशासनाने वेळेतच याची दखल घेत पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. यासंदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.




