मुंबई – महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सहा डिसेंबर रोजी बेळगावमध्ये जाण्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी केली. मात्र, ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवरची कोंडी झाली आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
https://maharashtramaza.online/?p=161546
महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावरून तणावाची स्थिती असताना या प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून ज्यांची नेमणूक केली त्या चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगावमध्ये जाण्याची घोषणा केली. आधी तीन डिसेंबर रोजी दौरा होता. परंतु महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला दौरा करू, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून सांगितले, पण आता ऐनवेळी हा दौरादेखील रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. येत्या काही महिन्यांत कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील दौऱ्यावेळी चर्चा कुणाशी करायची? हा प्रश्न मंत्र्यासमोर आहे. कारण चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने निमंत्रण दिले. तर कर्नाटकात अनेक मराठी नेते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांशी चर्चा करायची की एकीकरण समितीशी चर्चा करायची यावरून संभ्रम आहे.




