चिखली : जाधववाडी येथील रामायण मैदानाजवळ सार्वजनिक सभागृह असून, या सभागृहात विविध सार्वजनिक कार्यक्रम राबविले जातात, परंतु या सभागृहाला मुख्य दरवाजा नसल्याने रात्री आणि दुपारी काही लोकं इथे येऊन मद्य पिऊन धिंगाणा घालत असतात, तसेच सभागृहात दारूच्या बाटल्या आणि इतर घाण केलेली आहे.
काही दिवसांपासून अवैधरीत्या प्रवेश करून काही अज्ञातांनी सभागृहाच्या खिडकीच्या काचा फोडल्या आहेत, तसेच बाहेरील बाजूस लावलेल्या काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. या सभागृहासमोर मोठे मैदान आहे, या ठिकाणी विविध मोठमोठे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात, तसेच इथे मराठी मुलांची शाळाही आहे, तसेच या मैदानापासून शिव रोडला जाण्यासाठी रस्ता जातो, परंतु या ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री येथे अनेकदा तरुण फिरत असतात, तसेच भटके कुत्रीही असतात. त्यामुळे रात्री या रस्त्यावरून जाताना महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी जाणे-येणे धोक्याचे ठरत आहे.
तरी या प्रश्नावर प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे तसेच पथदिवे लावावे. त्याचबरोबर सभागृहाच्या मुख्य दारावर सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसह पालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण होईल.




