मुंबई – राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत असून छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे. दुसरीकडे सीमाभागातील गावांवर कर्नाटीकडून दावा केला जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याविरोधात आता येत्या १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध महापुरुषांबाबतची वादग्रस्त विधान केले आहे.
राज्यपालांना पदावरून पायउतार करणे आणि राज्याबाहेर जाणारे | उद्योग धंदे याविषयांना धरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरत व अन्य नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, येत्या १९ तारखेपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे.
या १९ तारखेच्या आधी १७ तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीचाच नव्हे तर मी सर्वांना विनंती करतोय की, ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही. त्या सर्वांना मी आमंत्रण देतोय की, चला आपण महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा, शक्तीचं एक विराट दर्शन या महाराष्ट्र द्वेष्टाने दाखवूया, असे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. सध्याचे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे, पण ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत. एकप्रकारे छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होत आहे.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
कर्नाटकमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नाबाबत वेगवेगळी वक्तव्यं सुरू ठेवली आहेत. दुसरीकडे राज्यात नवीन सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे. हे या सरकारचे अपयश आहे.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते



