- दत्तजयंती निमित्त पारायण, दिंडी सोहळा, कीर्तन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम.
चिंचवड: गुरु आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करतात, तर सद्गुरू जीवनाचा मार्ग दाखवतात. संसार होत असतो. परमार्थ करावा लागतो. अलिकडच्या पिढीने वडीलधाऱ्या मंडळींचा मान ठेवावा. संतवचनाचे संस्कार मनुष्य जीवनाला आकार देतात.असे मत हभप चंद्रकांत महाराज खळेकर यांनी व्यक्त केले. ते विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हेकरवाडी, सायली काॅम्प्लेक्स येथे गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने आयोजित्त दत्तजयंती सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमास चिंचवड भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, मंंडळाचे अध्यक्ष चंद्रहास वाल्हेकर, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, गणेश भोंडवे, संगीता भोंडवे, संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक तानाजी भोंडवे, राजाराम वाल्हेकर, प्रविण वाल्हेकर, शेखर चिंचवडे, आतिश वाल्हेकर, अमोल वाल्हेकर, प्रशांत वाल्हेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोंडीबा शिवले व राजाराम वाल्हेकर यांच्या हस्ते दत्तप्रभुंची आरती संपन्न झाली. मंडळाचे अध्यक्ष चंद्रहास वाल्हेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सुप्रसिद्ध गायक तुषार केळकर आणि सहकाऱ्यांनी संतवाणी सादर केली. वारकरी ,दत्तभक्त, महिला, आबालवृद्ध यांनी हरिपाठ, दिंडी सोहळा, कीर्तनसेवा यात सहभाग घेतला. परिसरातील भजनी मंडळींनी सादर केलेल्या भजनमालिकेने वातावरण भक्तिमय झाले होते. प्रविण वाल्हेकर यांनी आभार मानले.




