तळेगाव : मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घकाळ ठसा उमटविणारे, अध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय ७५) यांचे गुरुवारी दुपारी हृहयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
भेगडे यांना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
भेगडे यांनी इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.




