पुणे, दि. 8 – सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासह दैनंदिन जीवनाचा घटक बनलेल्या गुगल पेसह इतर यूपीआय पेमेंट ऍपद्वारे तिकिटाचे पैसे भरण्याची सुविधा पीएमपीकडून दि. 6 डिसेंबरपासून मिळणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव या सेवेला ब्रेक लावण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत ही सेवा सुरू होईल, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
दरम्यान, ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व बसेसमध्ये क्यूआर कोड लावण्यात आले. मात्र, आता ही सेवा पुढे ढकलल्याने त्या कोडवर पैसे भरल्यास प्रवाशांची अडचण होणार आहे. पीएमपीकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांना तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू होते.
मात्र, वारंवार अडथळे येत होते. अखेर बकोरिया यांनी पुढाकार घेत आधी प्रायोगिक तत्वावर ही सेवा पुणे दर्शन बसमध्ये सुरू केली. त्यानंतर ती सर्व बसेसमध्ये सुरू करण्यात येणार होती. त्यानुसार क्यूआर कोडही बसविण्यात येत होते. मात्र, ही आर्थिक बाब असल्याने तिकिटे, मार्ग आणि प्रत्यक्ष रकमेचा मेळ घालणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर आणि ऍपचे सिक्युरिटी ऑडिट झालेले नसल्याची बाब उपस्थित करण्यात आली. त्यानुसार पीएमपीने शासनमान्य संस्थेकडून यंत्रणेचे सॉफ्टवेअर तसेच सिक्युरिटी ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बकोरिया यांनी दिली.




