पुणे – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया दि. 29 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील संवर्ग एकमधील बदली प्राधान्य प्रवर्गनिहाय शिक्षकांची संख्या 1 हजार 328 इतकी असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे सुधारित वेळापत्रक ग्रामविकास खात्याने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार बदलीची प्रक्रिया सुरू असून, ती 18 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. विशेष संवर्ग भाग-1 च्या रिक्त शिक्षकांच्या पदांची यादी दि. 29 डिसेंबरला, तर विशेष संवर्ग भाग 2 ची रिक्त पदाची यादी 9 जानेवारी 2023ला प्रकाशित केली जाणार आहे. त्यातील सवंर्ग एकमधून बदली शिक्षकांची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली. एकूण 1328 शिक्षक हे सवंर्ग एकमध्ये येतात. यात वयाची 53 वर्षे पूर्ण झालेल्यांची संख्या 697 आहे. दिव्यांग प्रवर्गातील 280 शिक्षक आहेत तसेच विधवा, घटस्फोटित, कॅन्सर, हृदयविकार, डायलेसिस असे आजार असलेल्या शिक्षकांचा समावेश संवर्ग एकमध्ये समाविष्ट आहे. एकूण शिक्षकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली असली यातील किती जणांनी बदलीसाठी अर्ज केला आहे अथवा बदली नको, याची माहिती अद्याप संकलित नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही नव्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे, त्यानुसारच बदलीची सर्व कार्यवाही वेळेतच होणे आवश्यक आहे. यात कामात दिरंगाई अथवा कुचचाई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत




