पिंपरी: निगडी मधील अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या नव्या विद्युत दाहिनीचे काम गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. तथापि तेथे असणार्या एकाच विद्युत दाहिनीवर मोठा ताण येत आहे. तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमीत मृतदेह आणल्यानंतर तासोन-तास वाट पाहावी लागत असल्याने मृतदेहाची विटंबना होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन विद्युत दाहिनी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी अमरधाम स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहीनीवर व परंपरागत लाकडावर अंत्यविधी करण्यात येतो. दररोज किमान ०८ ते १० शवांचा अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यात येतो.यातील ०३ ते ०४ मृतदेहांचे दहन विद्युत दाहीनीवर करण्यात येते.विद्युत दाहीनीवर एक शव दहन होण्यासाठी सुमारे दोन ते तिन तासांचा अवधी लागतो.या काळात तेथे दुसरे शव अंत्यविधीसाठी आणल्यास अंत्यविधीसाठी तासोन-तास वाट पहावी लागते.
नव्या विद्युत दाहिनीचे काम ‘कल्याणी एंटरप्रायझेस’ या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यानुसार काही महिने त्यांनी काम चालू केले मात्र, गेल्या सात महिन्यापासून काम रखडले आहे. महापालिका व ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अंत्यविधीसाठी येणार्या मृताच्या नातेवाईकांना, नागरीकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खडतर जीवनप्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत आहे. हि आशिया खंडात नावलौकिक मिळवलेल्या महापालिकेसाठी शरमेची बाब आहे. त्यामुळे याची दखल घेऊन विद्युत दाहिनी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.




