पिंपरी : देशातील भाजपच्या मोदी सरकारने त्यांच्या पक्षातील वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांना “वाचाळीवर पुरस्कार” देऊन सन्मानित करावे. देशात अनेक चांगल्या कामांची नोंद घेण्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. मात्र देशातील परिस्थिती पाहता चुकीच्या गोष्टीसाठी ही पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसातून भाजपमधील अनेक नेत्याकडून थोर पुरुषांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. त्यामुळे देशाच्या इतिहासात अशा लोकांची नोंद होण्यासाठी या वाचावीरांना “वाचाळवीर पुरस्कार” देऊन सन्मानित करावे अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनते नाना काटे यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण…..
महाराष्ट्रातील मागील दिवसापासून राज्यपाल ते भाजप मधील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं होणाऱ्या वादांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद सुरू असताना पुन्हा भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.
यापूर्वी अहमदनगर मधील भाजपचे उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमला यांनी आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून सुरुवात केली. भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि भाजपचे मीडिया प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले उत्तराखंड भाजप प्रमुख बंशीधर भगत एका कार्यक्रमात अरे बुढ़िया तुझसे क्यों संपर्क करेंगे? असे वादग्रस्त विधान केले होते. शिवरायांच्या पुतळ्याच्या लाईटसाठी मला कपडे विकावे लागतील असे भाजप आमदार संतोष दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर दिल्लीत आंदोलक शेतकरी भारताबाहेरून मदत मिळवणारे खलिस्तानी, जिहादी आहेत असा आरोप भाजप खासदार जसकौर मीणा यांनी केला होता. तर पंढरपूर मंगळवेढ्याचे माजी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो असे विधान करून आपली अक्कल दाखवली. तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शेतकऱ्याला साला म्हटले होते. अशा भाजपच्या अनेक वाचाळ वीरांना केंद्रातील मोदी सरकारने वाचाळवीर पुरस्कार देऊन सन्मानित केली पाहिजे. अशी जाहीर मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.




