पिंपरी : पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना पोलिसानी न्यायालयात हजर केले. त्याच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत पाटील हे शनिवारी (१० डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी समता सैनिक दलाचे मनोज भास्कर गरबडे (वय ३४, रा. गोकुळ हॉटेलजवळ, पिंपरी) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. चिंचवड पोलिसांनी त्याला जागीच पकडून ताब्यात घेतले होते.
मनोज गरबडे याच्यासह त्याचे दोन साथीदार धनंजय भाऊसाहेब इजगज (वय ३९) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वय ४०, दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड) यांनाही पोलिसांनी अटक केली होती. धनंजय इजगज हे सुद्धा समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत. तसेच विजय ओव्हाळ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे शहर सचिव असल्याचे समोर आले आहे.
या तिघांवर कलम ३०७ सह ३५३, २९४, ५००, ५०१, १२० (ब) ३४ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)/१३५ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडे अधिक तपास करत आहेत.




