- पोलीस, पत्रकार व शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दादांनी केली राज्य सरकारकडे मोठी मागणी
पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका तर पोलिसावर कारवाई करणार नाही असे म्हणता आणि बारा तासात 11 पोलिसांना निलंबन करतात हे योग्य नाही अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. 11) भाजपवर हल्लाबोल केला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे “विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन’ शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. शिबिराला माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले महाराष्ट्राचे दैवत आहेत. मात्र, राज्यपालांपासून भाजपच्या लोकांकडून सातत्याने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये सुरू आहेत. ही वक्तव्य थांबण्याचे आवाहन केले.
- रोहित पवारावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाचे अजितदादांनी घेतली दखल
चंद्रकांत पाटील जेव्हा छाती बडवून मी बाबासाहेब संपूर्ण वाचलेत असे म्हणतात. त्याचवेळी तुम्ही खांद्यावरील रुमालाची झोळी करून बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण शिक्षण संस्था उभारणीसाठी भिक मागितली असा शब्द उच्चार कसा करता. समाजातील सामान्य घटकांना शिक्षण मिळावे यासाठी शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज अशा थोर महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.
तर चंद्रकांत पाटील एकटेच चळवळीमधून मोठे झालेले नाहीत. बाकीचे नेते थेट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झालेत का? पवार कुटुंबावर पोट तिडकीने बोलले की आपली किंमत वाढते असा भ्रम काहीना झालेला आहे. मी सुद्धा खेड्यातून राज्यातील सत्तेपर्यंत चळवळ करूनच मोठा झालो आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणी चॅलेंज करू नये. असे म्हणत अजितदादांनी चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
शाई फेकली म्हणून 307 कलम लागू शकते का?
आंबेडकर, फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने आक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. त्याना पोलीस प्रशासन योग्य शिक्षा देईल. मात्र राजकीय दबावातून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा ३०७ कलम लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणार का? हे योग्य नाही. तर दोन समाजात, धर्मात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणे, दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने चेतावणी देणाऱ्यांविरोधात भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार 153, 153 अ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या अवमान कारक टीका करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना 153, 153 अ कलम लावणार का? असा सवाल उपस्थित केला.
- ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई का केली
एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात पोलीस संरक्षण देतात. मात्र खाजगी भेटीत एखाद्या घटनेचा पोलिसांना अंदाज येत नाही. कालच्या घटनेचाही पोलिसांना अंदाज आला नसावा. त्या घटनेनंतर माध्यमांच्या समोर पोलिसावर कारवाई करू नका असे पाटील यांनी जाहीरपणे म्हटले होते. मग बारा तासातच ११ पोलिसांच्या वर निलंबनाची कारवाई का केली.
- व्हिडिओ काढला म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल करणार का?
कोणताही कार्यक्रम अथवा राजकीय नेते आल्यानतर पत्रकार आपली कॅमेरे सुरूच ठेवतात. तसा कालच्या घटनेचा प्रकार व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असावा. म्हणून त्या पत्रकाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे हे चुकीचे आहे, विनाकारण राजकीय नेत्याकडून असा चुकीचा पायंडा पाडला जावू नये असे अजित पवारांनी म्हटले आहे.
- पालकमंत्र्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर लक्ष द्यावे
राज्यात सत्ता येऊन सहा महिने होत आले तरीही पिंपरी चिंचवड महापालिकेतील विकास कामांच्या उद्घाटनाला वेळ देता आला नाही. किमान पालिकेत कोट्यावधी रुपयांची चाललेली उधळपट्टी तपासावी. चुकीच्या पद्धतीने होणारी निविदा टेंडर प्रक्रिया यावरती पालकमंत्र्यांनी अंकुश ठेवावा, एवढाच चंद्रकांत पाटील यांना मोलाचा सल्ला देतो असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर चौफेर टोलेबाजी केली.




