लोणावळा (वार्ताहर) लोणावळा शहरा – लगतची आदिवासी बहुल मात्र धनसंपन्न असलेल्या कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची लढत यावर्षी चौरंगी होणार आहे. सरपंच पदासाठी सुरेखा संदीप उंबरे, राणी सुनील भोरडे, रेश्मा दत्ता जाधव, नलिनी यशवंत उघडे या चार महिला रिंगणात असून सध्या गावात प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक जागा बिनविरोध झाली असून याठिकाणी कलावती उघडे ह्या बिनविरोध झाल्या आहेत तर उर्वरित जागांसाठी तब्बल १९ उमेदवार रिंगणात आहेत.
सदस्य पदासाठी माजी सरपंच संदीप वसंत उंबरे, सागर मधूकर उंबरे, भारती राजेंद्र पिंगळे, संगीता नारायण पिंगळे, मनिषा संजय ढाकोळ, बेबी चंद्रकांत खांडेभरड, संगम संजय वरे, भरत कैलास पिंगळे, सुरेश पदू होले, रामदास सुरेश लांडगे, अशोक दत्तू गोजे, शंकर दत्तू गोजे, शिवाजी शंकर लांडगे, कमल वाघमारे, रेश्मा वाघमारे, अश्विनी वाघमारे, रेश्मा भिवडे, जोस्मिन वाघमारे, संजय ढाकोळ, रामदास शेलार हे उमेदवार नशिब आजमावत आहेत.
मागील पंचवार्षिक काळात संदीप उंबरे यांनी सरपंच पदाच्या काळात गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे करत सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांना उपसरपंच संजय ढाकोळ यांनी मोठी साथ दिली होती. लोणावळा शहराच्या लगतची ही ग्रामपंचायत असून हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींचे बंगले तसेच डेल्ला तसेच डेल्ला अॅडव्हेंचर क्लब तसेच अनेक धनिकांचे बंगले असल्याने ग्रामपंचायत धनसंपन्न आहे. नुकतेच ग्रामपंचायतचे कार्पो रेट कार्यालय संदीप उंबरे व संजय ढाकोळ यांच्या कार्यकाळात झाले आहे. तसेच जवळपास साडेपाच कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. यामध्ये अंतर्गत रस्ते, पाणी योजना, स्मशानभूमी, गटारे आदी कामांचा समावेश आहे.
या निवडणुकीत जनतेचा कौल महत्वाचा असल्याने येणाऱ्या १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक मतदार कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सरपंच पदाची निवडणूक चौरंगी होणार आहे. आर्थिक संपन्न असलेल्या या ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी ही लढत होत आहे. त्यामुळे मतदार नेमके कोणाला कौल देणार हे महत्वाचे आहे.




