पिंपळे सौदागर (वार्ताहर) उन्नती सोशल – फाउंडेशन आणि ऑप्शन डेल्टा क्लब यांच्या वतीने स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे युवकांसाठी क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे आणि माजी निवृत्त पोलीस उप अधीक्षक अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, जगन्नाथ काटे, उद्योजक संजय भिसे, आनंदा हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जैसवाल यावेळी उपस्थित होते.
माजी निवृत्त पोलीस उप अधीक्षक अशोक चव्हाण म्हणाले, उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.
कुंदा भिसे म्हणाल्या, आम्ही परिसरात प्रशिक्षण केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्या अंतर्गत लष्करी दलातील आग्निवीर आणि सशस्त्र दलासाठी भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण मार्गदर्शन, लेखी परीक्षा, मैदानी सराव आणि मुलाखतीची परिपूर्ण तयारी तसेच युपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा, स्टोक मार्केट प्रशिक्षण केले आहे. डिजिटल मार्केटिंग, व्यवसायिक आणि प्रोजेक्ट व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करीत पिंपळे सौदागरमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
पी. के. इंटरनेशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले, सर्वांगीण शिक्षण हा युवकांच्या जीवनाचा विकास आणि परिवर्तन याची गुरुकिल्ली आहे. वसुंधरा गोडसे यांनी सूत्रसंचालन केले.




