पिंपरी (प्रतिनिधी) – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात शाईफेकीची घटना घडली. या प्रकरणी लावलेले कठोर गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी महापुरूष सन्मान कृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
तसेच या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे केलेले निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडली. या घटनेसंदर्भात महापुरुष सन्मान कृती समिती पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी केली.
याबाबत ठाकरे यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळीमनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी झोपडपट्टी विभाग शहराध्यक्ष संतोष निसर्गंध, नरेंद्र बनसोडे, मारुती भापकर, गिरीश वाघमारे, शिवशंकर उबाळे, विश्वनाथ जगताप, अविनाश चौधरी उपस्थित होते.




