पिंपरी (प्रतिनिधी) काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तृतीयपंथीयांच्या निवारागृह व संगोपन केंद्राच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन होत असल्याची बाब कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या वतीने आम्ही फ्लाइंग वुमन फाउंडेशनच्या पाठीशी कायम उभे आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
वाल्हेकरवाडी येथे फ्लाईंग वुमन फाऊंडेशन संचलित निराकार तृतीयपंथी निवारा गृह संगोपन केंद्राचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश सचिव पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, विशाल सरवदे, सुप्रिया सोलुंकरे, विठ्ठल शिंदे, अण्णा कसबे, मिलिंद फडतरे, पांडुरंग जगताप, आकाश शिंदे व फ्लाईंग वुमन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
छायावती देसले म्हणाल्या, भविष्यात फ्लाइंग वुमन फाऊंडेशनकडून तृतीयपंथीयांचा रोजगार, त्यांच्या हक्कासाठी तीव्र लढा उभारून महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी त्यांना काम मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.
हक्कासाठी लढणारी महिला
तृतीयपंथीयांच्या भावना समजून आमच्या हक्कासाठी लढणारी प्रथम महिला छायावती देसले आहेत. आमचे रोजगार, पेन्शन, स्वतंत्र स्वच्छतागृह, आरोग्य, नोकरीसाठी व आमच्या समस्या सोडविण्यासाठी देसले लढत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, या शब्दात पिंपरी -चिंचवड तृतीयपंथी सेलच्या शहराध्यक्षा देविका सूर्यवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.




