पिंपरी (प्रतिनिधी) – चार महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड लिंक रोडचे डांबरीकरण आणि सुशोभिकरण महापालिकेने केले होते. मात्र गावडे पेट्रोल पंपाजवळ हा रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे महापालिकेच्या विविध विभागांचा आपसांत समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिवस आले.
पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे अर्बन स्ट्रीट हा प्रकल्प राबविण्यात आला. मोठे पदपथ, त्यावर बसण्यासाठी मार्बलसारखे दिसणारे बेंच, रस्त्याच्या कंडेला सुशोभित लाइट नुकतेच डांबरीकरण केले रस्ते, त्यावर सायकल ट्रॅक या कामांमुळे या रस्त्याचे रूपडे पालटले. अवघ्या चार महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे व पदपथाचे काम करण्यात आले असून त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
मात्र येथील कामे करण्यापूर्वी ड्रेनेज किंवा केबल टाकरण्याचे काम होणे आवश्यक होते. मात्र महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने रस्त्याचे काम केल्यानंतर काही महिन्यातच केवल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. असाच अनुभव लिंकरोड येथे आला आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. खोदलेल्या या रस्त्याची माती परिसरात पसरली असून त्यावरून वाहने घसरून पडत आहेत.




