पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ८.८ किलोमीटर लांबीची जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि १८.९० किलोमीटर लांबीची गुरुत्व (ग्रॅव्हीटी लाइन) अशी एकूण २७.७० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ही जलवाहिनी खेड आणि मावळ तालुक्यातील सहा गावांमधून येणार असून भूसंपादन केले जाणार आहे.
शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०३१ पर्यंतची विचारात घेऊन महापालिकेकडून आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार, राज्य सरकारने आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे एकूण २६७ एमएलडी पाण्याचा कोटा २४ ऑक्टोबर २०१८ मध्ये मंजूर झाला आहे. या पाण्याचा वापर शहरात नव्याने विकसित होणाऱ्या भागासाठी पाण्याचं नियोजन होणार आहे.




