निगडी : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही दिवसात आड पाणीपुरवठा शहरात होत आहे. यमुनानगर मध्ये मागील दहा ते बारा दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गा चौकातील माजी नगरसेवक भीमा बोबडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पाण्याची पाईपलाईन खोदकाम करताना जेसीबीने तोडली. त्यामुळे लाखो लीटर पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे.
याची माहिती नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना दिली. मात्र वामकुशीत असणाऱ्या स्थानिक नगरसेवकपैकी सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. सकाळी पहाटे चार वाजल्यापासून पाणी रस्त्यावर वाहत होते. आमचे प्रतिनिधी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत घटनास्थळी होते तरीही निर्ढावलेल्या अधिकारी या ठिकाणी कोणीही उपस्थित राहिले नाहीत.
याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता त्यांनी मागील आठ ते दहा दिवसापासून आमच्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे सांगितले. दुर्गानगर चौकात फुटपाथच्या नावाखाली मागील पंधरा दिवसापासून काम सुरू आहे. केवळ चौकात खड्डा करून ठेवला आहे. त्याबाबत अद्याप पुढे काहीही काम केलेले नाही. महापालिकेचा भोंगळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा झाल्याने वेळप्रसंगी आम्ही सर्व नागरिक महापालिकेवर मोर्चा काढू असेही नागरिकांनी म्हटले आहे.




