- सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी : निगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये उड्डाणपुलावर वारकरी संप्रदायाची विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली होती. परंतू या चित्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्राचे काम अपूर्ण असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत अखेर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून ‘कै.मधुकर पवळे पुलाची रंगसफेदी करणे व स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे’ करणे या शिर्षकाखाली र.रू. 1,06,49,239/- निविदा दर मागविण्यात आले होते. त्यानुसार ‘मे.राहूल कन्स्ट्रक्शन’ या पात्र ठरलेल्या ठेकेदारास तब्बल 77,68,027/- रुपयांस काम देण्यात आले होते. त्यानुसार सन-2021 साली कै.मधुकर पवळे पुलाची रंगरंगोटी तसेच सुशोभीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.
हा उड्डाणपुल जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मार्ग असल्याने पुलाच्या खालील बाजूस वारकरी संप्रदायाची पालखी प्रसंगाची विविध प्रकारची चित्र, अभंग तसेच आकर्षक सांप्रदायिक सुशोभीकरण करून उड्डाणपुलाचे काम करण्यात आले. परंतू या चित्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्राचे काम अपूर्ण असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी जनसंवाद सभा, सारथी हेल्पलाईन तसेच महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार या मागणीची दखल घेत पवळे पुलावरील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्राची रंगरंगोटी करून काम पूर्ण करण्यात आले आहे.




