पिंपरी :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि ओएनपी लीला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत तीन दिवसीय दंत आणि आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शाळेतील ८५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उदघाटन शाळेचे संस्थापक, अध्यक्ष संदीप काटे यांनी केले. यावेळी शाळेच्या संचालिका अनिता संदीप काटे, बालरोग तज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस, डॉ. राकेश चिंचोलीकर, श्रीप्रसाद, परिचारिका आणि शाळेच्या प्राचार्या, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये मुलांचे पोटाचे आजार, डोळयांचे आजार तसेच दंत तपासणी केली. तसेच मुले स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तपासणीनंतर शालेय मुलांना औषधाचे वाटप केले.
अनिताताई काटे म्हणाल्या, सध्या शहरात थंडी, ताप, सर्दी, खोकला, स्वाईन फ्ल्यू, डेंगु, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांनी धुमाकुळ घातला आहे. या साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील उपस्थितीवर परिणाम होऊन मुलांची उपस्थित संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शिबिराचा नक्की फायदा होईल. या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला ओएनपी लीला हॉस्पिटलने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सरदेसाई यांनी तर दीप्ती बक्षी यांनी आभार मानले.




