पिंपरी – पिंपरी-चिंचवड राजकारणातील प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अजीवन नेतृत्व करत राहिले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळेगुरव गावठाण येथील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाऊंच्या चाहत्यांचा जनसागर उसळला होता.

पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक विकसित मतदारसंघ म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली होती. लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाले होते. तसेच विधानसभेचे आमदार होण्यापूर्वी ते विधान परिषदेवर निवडून आले होते.

२०१९ च्या निवडणुकीतील विजयानंतर वर्षभरातच त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. तरीही त्यांनी कोरोना संकट काळात स्वतःपेक्षा नागरिकांना मदत करण्यात धन्यता मानली होती. कोरोना काळात त्यांनी गोरगरीब व गरजू नागरिकांना त्यांनी भरपूर मदत केली. उदरनिर्वाह असो की हॉस्पिटल असो त्यांनी नागरिकांना मदत करून माणुसकी जपली. कर्करोगाचा आजार बळावल्याने गेल्या वर्षभरापासून त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर अतिशय कमी झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथूनही ते नागरिकांची कामे करत होते. शहरविकासासाठी निगडीत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयासोबत चुकीच्या कामाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करत होते. पण आजारासोबत असलेली त्यांची झुंज मंगळवारी अखेर अपयशी ठरली.
निधनानंतर अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार विलास लांडे, आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौंबे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदींसह शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी फुलांनी सजविलेल्या गाडीतून पिंपळेगुरव येथील निवासस्थान ते गावठाणातील मैदानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैरी झाडत पोलिसांनी त्यांना सलामी दिली.




