पिंपरी : २०१४ ची निवडणूक होती. त्यावेळी मी लक्ष्मणला सांगितल होते की, तू अपक्ष उभा राहा, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत तुझा मोबाईल ऑन करायचा नाही, वरिष्ठांचा दबाव होता. त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी मीच त्याला अपक्ष उभे केले आणि त्याचा लोकसंपर्क आणि काम चांगले असल्यामुळे लक्ष्मण मोठ्या मताने निवडून आला, असा अविस्मरणीय किसा सांगत त्यांच्या आठवणी जागवल्या आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला.
अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच त्यांनी त्यांच्या मुलांची देखील आपुलकीने विचारपूस केली. यावेळी अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्याशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या सोबत घडलेल्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
एका वेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. अजित पवार आणि लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडमध्ये एक समीकरणच होते. अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने चौकशी केली. लक्ष्मण जगताप यांच्या जडणघडणीत अजित पवार यांचा मोठा वाटा असल्याचे अनेकदा आपण एकले आहे. राजकारणात काळानुसार समीकरणे बदलतात, असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचे सर्वांत विश्वासू नेते अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भाजप प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांचंही मन जिंकलं. मात्र अजित पवार यांच्यासोबतचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. त्यामुळेच आता जगताप यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतल्याचं पाहायला मिळालं.



