![]()
पुणे : पक्षातील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी असलेले मतभेद दूर करा. वेळप्रसंगी चर्चा करा. हेवेदावे विसरा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लावल्या जातील. त्यामुळे निवडणुकांच्या तयारीला लागा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आमदारासह पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शिरुरचे आमदार अशोक पवार, इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे, मावळचे आमदार सुनील शेळके तसेच बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांनी हजेरी लावली होती. या बैठकीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आयोजन केले होते. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीवर भाष्य करीत पवार यांच्याकडे सहकारी पक्षांबाबतच्या तक्रारीही केल्या.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्ह्याची आढावा बैठक झाली. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यासासंबंधी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. या बैठकीस उपस्थित राहून इंदापूर तालुक्यातील पक्ष संघटनेच्या विविध बाबींवर विस्तृत चर्चा केली, अशी माहिती दत्तात्रय भारणे यांनी ट्विट करून दिली.


